ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे आरेवाडी ते करलहट्टीपर्यंत जाणाऱ्या टेंभू योजनेच्या कामाची पाहणी आमदार सुमनताई पाटील यांनी अधिकारी व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत केली.
आरेवाडी ते करलहट्टीपर्यंत जाणाऱ्या टेंभू योजनेचे काम प्रगतीपथावर असून, लंगरपेठ व नांगोळे येथे पाण्याच्या चाचण्या घेण्यासाठी तयार आहे. ढालगाव वितरिकेचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वे क्राॅसिंगजवळ चाचणी करण्यात येणार आहे. टेंभू योजना बंदिस्त पाइपलाइनद्वारे असून, टेंभू योजना ढालगाव परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेतून लवकरच पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार सुमनताई पाटील यांनी टेंभू योजनेचे अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आरेवाडी येथे योजनेच्या कामाची पाहणी केली.
यावेळी सभापती विकास हाक्के, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, कार्याध्यक्ष महेश पवार, माजी सभापती एम. के. पाटील, माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर उपस्थित होते.