आटपाडी : आटपाडी तालुक्यात निकृष्ट रस्ते कामाची जिल्हा समितीने शनिवारी पाहणी केली. या वेळी ठेकेदारांना पुन्हा रस्ते काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अधिकाऱ्यांना स्वतः लक्ष देण्याचे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता वृंदा पाटील यांनी आदेश दिले.
आटपाडी तालुक्यातील पश्चिम भाग असणारे दत्त मंदिर ते ठोंबरे वस्ती, उंबरगाव ते ठोंबरे वस्ती, जांभुळणी ते बेरगळवाडी व झरे ते काळचौंडी, तर विभूतवाडी ते गुळेवाडी या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामासाठी डांबरीकरण करत असताना ४० एमएम खडी वापरली गेली नाही. त्यामध्ये डांबर वापरले नसल्याने एकाच महिन्यामध्ये संपूर्ण रस्ता उखडला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत शनिवारी सांगली जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता वृंदा पाटील, उपअभियंता पंचायत समिती आटपाडी डी.बी. चव्हाण, जी.एस. लांडे, कनिष्ठ अभियंता बी.एस. जोजन यांच्या कमिटीने कामाची पाहणी केली. या वेळी अनेक ठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडल्याचे व खडीमध्ये डांबराचा वापरच केला नसल्याचे आढळले.
या वेळी विभूतवाडीचे सरपंच चंद्रकांत पावणे, अधिकराव माने, विष्णुपंत अर्जुन, सिद्धा थोरात, रमेश खर्जे, हरिदास कांबळे, मुंनाभाऊ चव्हाण, मोहन खर्जे, अनिल हाके, विलास चव्हाण, विवेक पावणे, संजय थोरात, आप्पा भानुसे, प्रल्हाद जनकर, बंडू दडस, सोमा ठोंबरे, रवींद्र ठोंबरे आदी उपस्थित होते.