फोटो ओळ : वाळवा येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पूरग्रस्त गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : शिरगाव व वाळवा भागातील पूरग्रस्त गावांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शेट्टी यांनी महापुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची माहिती घेतली.
शेट्टी म्हणाले, २०१९प्रमाणे शेतकऱ्यांना आघाडी सरकारने कर्जमाफी द्यावी, द्राक्ष बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी. ज्यांनी कर्ज काढले नाही त्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार चारपट पिकांची नुकसानभरपाई द्यावी, ज्यांची घरे पडली आहेत, त्यांना पंतप्रधान आवास योजनेमधून घरे बांधून मिळावीत तसेच ज्यांना पूरकाळात घरे सोडावी लागली त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली.
शिरगाव येथे चारही बाजूंनी पाण्याने वेढा दिला आहे. येथील जनावरांना पशुखाद्य व सुक्या चाऱ्याची गरज आहे, त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना शेट्टी यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपसभापती नेताजी पाटील, वाळव्याच्या सरपंच डॉ शुभांगी माळी, शिरगावच्या सरपंच दीपाली शिंदे, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, वर्धमान मगदूम, किसन गावडे, चंद्रशेखर शेळके, अभिजीत नवले, भरत नवले, भागवत जाधव, माणिक पवार, बजरंग आंबी, स्वप्नील कणसे उपस्थित होते.