डॉ. महेश जाधव याच्या मिरजेतील अॅपेक्स केअर कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. जाधव याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह अन्य ७ रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. डाॅ. जाधव यास मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने अपेक्स रुग्णालयातील अकौंटंट निशा पाटील हिलाही अटक झाल्याने अॅपेक्सप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या ८ झाली आहे. निशा पाटील हिच्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतलेल्या जादा बिलाबाबत व बिलातील घोटाळ्याबाबत माहिती मिळवायची आहे. डाॅ. जाधव याच्या घरात व रुग्णालयात मिळालेल्या कागदपत्रांची छाननी करायची असल्याने डाॅ. जाधव याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी शुक्रवारी मिरज न्यायालयात केली. न्यायालयाने डाॅ. जाधव व निशा पाटील या दोघांनाही सहा दिवस पोलीस कोठडी दिली. डाॅ. जाधव यास गतवर्षी तीन महिने व यावर्षी तीन महिने कोविड रुग्णालयाचा परवाना महापालिकेने दिला होता. जाधव याच्या रुग्णालयात गतवर्षी ५४ व यावर्षी तब्बल ८७ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. यामुळे डॉ. जाधव याच्याकडे आवश्यक वैद्यकीय सुविधा नसतानाही कोविड रुग्णालयास मिळालेली परवानगी रुग्णांच्या जीवावर बेतल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ एक पानी अर्जावर नियमबाह्य परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर याप्रकरणी कारवाईची शक्यता असून, पोलीस याबाबत कायदेतज्ज्ञांचा अभिप्राय घेत आहेत. काही महापालिका अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचे डाॅ. जाधव याने कबूल केल्याने याप्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
महेश जाधवच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST