सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या लुटीच्या प्रकरणातील मुख्य संशयित मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याच्या खूनप्रकरणी अटकेत असलेल्या चार संशयितांच्या पोलीस कोठडीत आणखी सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
रवी हरी चंडाळे (वय ३६, रा. शिवाजी मंडई), शफीक अजमुद्दीन खलिफा (४५, रा. जोतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी), नाना ऊर्फ बाळासाहेब दादासाहेब पुकळे (३७, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), आप्पा ऊर्फ भीमराव मल्लाप्पा वाणी (३६, रा. झाशी कॉलनी, सांगलीवाडी) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत मोहिद्दीन मुल्ला आणि वाणी हे चांगले मित्र होते. मात्र, पैशावरून त्यांच्यात वाद होत होता. वाणीने मुल्लाला काही रक्कम दिली होती. वाणी हा ती रक्कम मुल्लाकडे परत मागत होता. मात्र, ती देत नसल्याने त्यांच्यातील वाद वाढला होता. त्यामुळे संशयितांनी संगनमताने मुल्लाचा कोयत्याने सपासप वार करून खून केला होता. पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली. आता पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.