लाेकमत न्युज नेटवर्क
बुधगाव : कवलापूर (ता. मिरज) येथील उशांत क्रीडा मंडळ संचलित, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्राच्या आमदार महेश लांडगे बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन खासदार संजय पाटील यांच्याहस्ते, तर आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटचे उद्घाटन राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्याहस्ते झाले.
माती आखाडा व हनुमान मूर्तीचे पूजन हिंदकेसरी दीनानाथ सिंह, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते झाले. डॉ. अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार सुरेश खाडे, मीरा-भाईंदरच्या गणेश आखाड्याचे वसंतराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. पाटील, सेनाकेसरी गुंडाजी पाटील, आंतरराष्ट्रीय मल्ल बाबाजी पाटील, प्रतापराव शिंदे, हनुमंतराव जाधव, विनायक पाटील, सरपंच शुभांगी नलावडे, उपसरपंच सौरभ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास पाटील, छायाताई पाटील आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. हिंदकेसरी दीनानाथ सिंह म्हणाले, ‘हरियाणासारख्या छोट्या राज्यात कुस्तीकडे विशेष लक्ष राज्य सरकार देते. तसेच महाराष्ट्रातही अपेक्षित आहे. खासदार संजय पाटील म्हणाले, उत्तमराव पाटील यांच्या कुस्ती केंद्राच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळविणारे मल्ल तयार होतील. राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले, जिल्हा तालीम संघ आणि राज्य कुस्तीगीर परिषद उत्तमराव पाटलांच्या या कामाला साथ देईल.
मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील, खजिनदार विष्णू माळी, सचिव तानाजी तावदरकर, प्रशिक्षक दीपक पाटील, विश्वस्त प्रकाश माळी यांनी संयोजन केले. जोतिराम वाजे यांनी सूत्रसंचालन केले. सदाशिव पाटील यांनी आभार मानले.