लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने व्हावी व जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत सरकारच्या घोषणेप्रमाणे जसा आदिवासींना लाभ देण्यात येतो, तसा अंमलबजावणी होईपर्यंत धनगर समाजाला लागू करण्यासाठी राज्य शासनाला सूचना करावी, अशी मागणी भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पत्राव्दारे केली.
आ. पडळकर म्हणाले, धनगर समाजाची गेली अनेक वर्षापासून एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे. परंतु, राज्य सरकार त्याविषयी फारसे गंभीर नाही. मागील भाजप सरकारने जोपर्यंत एस.टी.ची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आदिवासींना ज्या योजना आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ धनगर समाजाला देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे सन २०१९-२० या वर्षासाठी २२ योजनांसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूद करून त्यातील ५०० कोटी रूपये वर्गही करण्यात आले होते. परंतु, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजासाठी एकही रूपयांची तरतूद केली नाही. त्यामुळे मागील सरकारने मंजूर केलेल्या २२ योजनांसाठीच्या सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षाचे प्रत्येकी एक हजार कोटी असे एकूण दोन हजार कोटी रूपये मंजूर करण्याची सूचना राज्य सरकारला करावी.
फोटो - ०६०७२०२१-विटा-पडळकर : मुंबई येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत आ. गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी धनगर समाजाच्यावतीने राज्यपालांचा घोंगडी देऊन सत्कार केला.