सांगली : गतवर्षीप्रमाणे यंदाही सांगलीकरांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. आजअखेर महापालिकेच्या कृत्रिम कुंड, तलावात चार हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. ३७ टन निर्माल्यही जमा झाले.
महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी घाटावर गर्दी होऊ नये, यासाठी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांत २१ कृत्रिम कुंड, ६ तलाव, दोन फिरती विसर्जन केंद्रे व निर्माल्य जमा करण्यासाठी ३५ केंद्रांची व्यवस्था आहे. पाचव्या दिवशीच्या विसर्जनापर्यंत कुंड व तलावात ४१३७ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. प्रभाग समिती एकच्या कार्यक्षेत्रात तलावात ३६४, कृत्रिम कुंडात ६१९, प्रभाग समिती दोनमध्ये तलावात ३१०, कुंडात १२७७, कुपवाड शहरात तलावात ३२८, कुंडांत १०७५, तर मिरजेत तलावात ५६ व कृत्रिम कुंडांत १०८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिरजेत अनंत चतुर्दशीलाच मंडळे व घरगुती गणपतीचे विसर्जन होते. गेल्या पाच दिवसांत ३५ केंद्रांत ३७.५५ टन निर्माल्यही जमा झाले आहे. नागरिकांनी मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन न करता कृत्रिम कुंड, तलावात विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षणात हातभार लावावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
चौकट
४१० गणेशमूर्तींचे दान
गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशमूर्ती दान उपक्रमालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत महापालिकेकडे ४१० मूर्ती दान करण्यात आल्या आहेत. यात सांगलीतून २९५, कुपवाड ६५, तर मिरजेत ५० मूर्ती दान करण्यात आल्या.
चौकट
कृत्रिम तलाव : १०५८
कृत्रिम कुंड : ३०७९
मूर्तिदान : ४१०
निर्माल्य जमा : ३७.५५ टन