सांगली : कोरोनाच्या बंधनाने, चेहऱ्यावरच्या मास्कने आता महिलांच्या चेहऱ्यावरची लाली घालविताना कॉस्मेटिक बाजाराचाही बेरंग केला आहे. कोरोनाच्या बंधनात आता ‘मी कशाला आरशात पाहू गं’ असं म्हणण्याची वेळ महिलांवर आली आहे.
महिलांचे नटणे ही कला असली तरी या कलेला मोठे अर्थकारणही चिकटले आहे. ब्युटिशियन, पार्लर, कॉस्मेटिकचा बाजार या सर्व गोष्टींना नटण्याची कला बांधली गेली आहे. नटण्यातून आत्मविश्वास वाढतो, स्वत:सह दुसऱ्यांनाही आनंद व सकारात्मक ऊर्जा देण्याचे कामसुद्धा यातून होते. मात्र, या सर्व गोष्टींचा कोरोनाने बेरंग झाला आहे. स्वावलंबानाचे पाऊल टाकत पार्लर टाकलेल्या हजारो महिलांचा रोजगार कोरोनाने हिरावला आहे. त्याशिवाय कॉस्मेटिकचे विक्रेते, होलसेल व्यापारीही यात भरडले गेले आहेत. गेल्या वर्षभरात या क्षेत्रातील कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
लग्नाच्या कार्यक्रमांवर बंधने येत असल्याने नवरा-नवरीच्या नटण्याला मर्यादा आल्या. पार्लर बंद झाले. मास्कमुळे महिलांनी नटण्यालाही आता मुरड घातली आहे.
कोट
गरीब महिलांच्या रोजगाराचे काय?
एकीकडे कोरोनामुळे पार्लर बंद आहेत. कर्ज काढून अनेक महिलांनी स्वावलंबनाचे पाऊल म्हणून पार्लर उघडले; पण आता ते बंद असल्याने त्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांच्या रोजगाराचे काय? खूप मोठा फटका या कोरोनाने या व्यवसायाला बसला आहे.
- अस्मिता भाटे, ब्युटी पार्लरचालक
कोट
लग्नांअभावी व्यवसायावर परिणाम झाला
पूर्वीपासूनच आम्ही मोजकेच ग्राहक घेत होतो. स्वच्छता, प्रत्येक ग्राहकानंतर संबंधित साहित्य सॅनिटाईज करणे या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या बंधनामुळे अवघड काही वाटले नाही. तरीही लग्न सोहळ्यांवरील परिणामांचा या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
- रूपश्री ओझा, ब्युटी पार्लरचालक
कोट
लाखो रुपयांचे साहित्य फेकले
गेल्या वर्षभरात आमचा ७० टक्के व्यावसाय ठप्प आहे. कॉस्मेटिक साहित्य काही काळातच एक्सपायरी झाल्यानंतर फेकून द्यावे लागते. त्यातून मोठा फटका बसला. लग्न सोहळे, पार्लर बंद असल्यानेही नुकसान झाले. दुसरीकडे देणी, कर चुकत नाहीत.
- सूरज पळसुले, कॉस्मेटिक विक्रेते, सांगली
कोट
नटण्याने आत्मविश्वास वाढतो
नटण्यामुळे आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे टापटीप राहणे महत्त्वाचे असते. कोरोनामुळे या नटण्यावर थोडी मर्यादा आली असली तरी आम्ही नटण्याचे सोडले नाही. पार्लर बंद असले तरी घरातील साहित्य वापरून आम्ही साजशृंगार करतो.
- सीमा लाड, सांगली
कोट
नटण्याकडे झाले दुर्लक्ष
पार्लर बंद असल्याने, तसेच बाहेर पडताना मास्क घालावा लागत असल्याने महिलांचा नटण्याकडील कल कमी झाला आहे. त्यामुळे खर्च कमी झाला. मात्र, दुसरीकडे ज्या महिलांसाठी पार्लर हे रोजगाराचे साधन होते त्यांना मोठा फटका बसला आहे.
- वीणा कांबळे, सांगली