बागणी : वाळवा तालुक्यातील बागणी परिसरात अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. बेकायदेशीर दारू विक्री, खासगी सावकारी, जुगार, मटका यासारख्या अवैध व्यवसायांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध व्यवसायांविरोधात कणखर भूमिका घेतली. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांना टाळे लागल्याचे चित्र आहे. याला बागणी परिसर मात्र अपवाद ठरला.
बागणी परिसर अवैध व्यवसायांचे केंद्र बनले आहे. सांगली येथील भरारी पथकाने यामागे धाडी टाकल्या होत्या सांगलीहून गाड्या निघाल्या की, मोबाईलला मेसेज येतो व अवैध व्यावसायिक आलबेल होतात. त्यांना कोणी पकडू शकत नाही. असे का होते, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. या परिसरात नडलेल्या शेतकऱ्याला मासिक १० टक्के व्याजाने अर्थसाहाय्य करणाऱ्या सावकारीत देखील स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस ही स्पर्धा आणखी वाढत असून यात महिला सावकारांची मोठी भर पडत आहे.
बागणी परिसरातील वस्त्यांमध्ये अवैध दारू सहजासहजी उपलब्ध होत असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. जोडीला मटका आणि जुगार याची देखील साथ असल्याने अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. या सर्व गोष्टींना मोठ्या लोकांचे पाठबळ व पोलिसांच्या गांधारीच्या भूमिकेने बळ मिळत आहे. यामुळे अवैध व्यावसायिकांविरोधात तक्रार तरी कोणाकडे करायची, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.
चाैकट
पोलीस प्रमुखांनी लक्ष द्यावे
अनेकवेळा कारवाईनंतर अवैध व्यवसाय बंद होणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता नव्या जोमाने अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. याकडे पोलिसांचे कोणत्या कारणाने दुर्लक्ष सुरू आहे, हे न समजण्याइतपत परिसरातील लोक अज्ञानी नाहीत, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायांविरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांनी कारवाई करावी, असी मागणी होत आहे.