सांगली : मोठ्या प्रयत्नाने म्हैसाळचे पंप सुरू झाले असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु याप्रश्नी वारंवार काही नेत्यांकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. अशा गोष्टीत कोणी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, सकाळी म्हैसाळ टप्पा क्र. १ येथे जाऊन पाहणी केली. मागील पाच वर्षांपासून पंपांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी दारांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे. अशी परिस्थिती असली तरीही अधिकाऱ्यांनी म्हैसाळचे तीन पंप सुरू केले आहेत. ते पूर्ण क्षमतेचे चालविण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. तरीही त्यांच्यामध्ये काहीजण येण्याची शक्यता आहे. कॅनॉल व दरवाजे फोडून पाणी चोरणे आदी प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडले तर, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आड येणाऱ्या मंडळींवर नाईलाजाने कारवाई करावी लागेल. दुरुस्ती खर्चासाठी २ कोटी निधीची मागणी असून, आवर्तन संपल्यानंतर संबंधित निधी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या शनिवारी बेडग येथील पंपाची पाहणी करण्यात येणार आहे. त्यावेळी पाणी क्षेत्राचा लाभ होणाऱ्या गावातील प्रमुख नागरिकांची बैठक घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांना पाणी मागणीचे फॉर्म भरणे गरजेचे आहे. म्हैसाळप्रश्नी कोणी राजकारण करू नये. अधिकाऱ्यांनी कोणाच्याही राजकारणाला बळी पडू नये, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. रोटेशन पध्दतीनेच पाणी सोडण्यात येणार आहे. सोशल मीडियावरून काहीजण टीका-टिप्पणी करण्यात मग्न आहेत. परंतु कोणीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करू नये. (प्रतिनिधी)पुतनामावशीचे प्रेम ओळखून...नागेवाडी येथील यशवंत कारखान्याची सुनावणी बुधवारी दिल्लीत झाली. त्यामध्ये अनिल बाबर यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच हा खटला काढून टाकण्यास सांगितले आहे. यामुळे बाबर यांनी खटला मागे घेतला आहे. भविष्यकाळात या प्रश्नावरून ग्रामस्थांकडून पैसे काढण्याचा उद्योग कोणी करू नये कारण पुतनामावशीचे प्रेम लोक ओळखून असल्याचे पाटील यांनी सांगितले.म्हैसाळच्या वीजबिलाची थकबाकी ४ कोटी रुपये आहे. आणखी दोन महिने योजना कार्यान्वित करायची झाल्यास ६ कोटी विजेचा खर्च आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
कुरघोड्या कराल, तर जशास तसे उत्तर
By admin | Updated: April 9, 2015 00:03 IST