नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे जिल्हा परिषदेने माझी शाळा आदर्श शाळा हे अभियान सुरू केले आहे. शाळांच्या भाैतिक सुविधाबरोबर गुणवत्तावाढीसाठी या अभियानातून प्रयत्न केला जाणार आहे. अशा तालुक्यातील २० शाळांमध्ये मॉडेल स्कूल बनवण्यात येणार आहे.
नेर्ले गावातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ मध्ये मॉडेल स्कूल बनवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. सुरुवातीस हँडवॉश स्टेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये मुलांना हात धुण्यासाठी सहा चाव्या तयार करण्यात येणार आहेत.
निवड करण्यात आलेल्या शाळांत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, हँडवॉश स्टेशन, संरक्षक भिंतल क्रीडांगण, क्रीडा साहित्य, फर्निचर, परिसर सुशोभीकरण, ई-लर्निंग अशा सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या सुविधा पुरवण्यासाठी डीपीसी १४/१५ वित्त आयोग, स्थानिक विकास निधी, लोकसहभाग जलजीवन मिशन, नरेगा विभाग, एनजीओ, समाजकल्याण यांच्याकडून निधी मिळणार आहे. नेर्ले गावात सध्या हँडवॉश स्टेशनचे काम सुरू आहे. त्यानंतर स्वच्छतागृह आणि क्रीडांगण यांची कामे सुरू होणार आहेत.