फोटो ओळ :
तडसर (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, शांताराम कदम, हणमंतराव पवार, समीर मुल्ला आदी उपस्थित होते.
कडेगाव : तडसर ग्रामपंचायतीने नावीन्यपूर्ण योजना राबवित मोठ्या प्रमाणावर ग्रामविकासाची कामे केली आहेत. यामुळेच तडसर गावाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक बक्षिसे व पारितोषिके प्राप्त झाली आहेत. या गावाचा आदर्श घेऊन इतर गावांनीही ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
तडसर (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आयोेजित एक कोटीच्या विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यंकटराव पवार, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले, तडसर गावासाठी पशुवैद्यकीय दवाखाना लवकरच मंजूर करण्यात येईल व यासाठी अद्ययावत व सर्व सोयी-सुविधांनियुक्त इमारतही बांधण्यात येईल. याशिवाय तडसर येथील नियोजित शिवस्मारकासाठी भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
यावेळी प्रतापराव पवार, समीर मुल्ला यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच हणमंतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. आकाश पाटील यांनी आभार मानले.