सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेतर्फे आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आमदार विक्रम सावंत, सुमनताई पाटील, विशाल पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्ह्याने राज्याला तसेच देशालाही अनेक सुुपुत्र दिले. वसंतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी राज्याला दिशा दिली. आदर्श माता पुरस्कारातून अशा महिलांना प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. सांगलीत राजर्षी शाहू शिक्षण संस्थेच्या राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते.
संस्थेतर्फे जिल्हाभरातील बारा महिलांना आदर्श माता पुरस्काराने पटाेले व आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देवयानी देशमुख (कडेपूर), शहाजादबी पीरजादे (कामेरी), इंदू सावंत (सावंतपूर), शांताबाई खरमाटे (वंजारवाडी), मंगल शिंदे (पोसेवाडी), आक्का पाटील (मणदूर), पार्वती कुंभार (हरिपूर), छबू चोथे (करगणी), सुमन पाटील (सांगली), नीलिमा पाटील (मिरज), गुजव्वा नाटेकर (उमदी) व बायनाबाई साबळे (नांगोळे यांचा गाैरव झाला. पटोले म्हणाले, भारतीय संस्कृती मोठी आहे. मात्र, आताची पिढी पाश्चिमात्य संस्कारांकडे वळू लागली आहे. भारतीय संस्कृती जपण्यासाठी आदर्श माता पुरस्कारासारख्या कार्यक्रमांची गरज आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळते. सांगली, सातारा जिल्ह्यांनी अशी प्रेरणा अनेकांना दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, आदर्श मातांमुळेच देशाचे नेतृत्व करणारी माणसे घडली. बदलत्या काळात त्यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
यावेळी आमदार सुमनताई पाटील, विक्रम सावंत, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाला शाम पांडे, विवेक कांबळे, संजय कांबळे, संदेश भंडारे हेदेखील उपस्थित होते. शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांचा एकसष्टीनिमित्त सत्कार झाला. स्वागत मालुश्री पाटील यांनी व प्रास्ताविक विठ्ठल पाटील यांनी केले. आभार गगनराज पाटील यांनी मानले.
चौकट
राजकारणात काहीही होऊ शकते
पटोले म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकते. रामदास आठवले भाजपसोबत आणि मी काँग्रेसमध्ये काम करेन याची कल्पनाही कोणी केलेली नव्हती, पण तसे घडले.