सांगली : गोडव्यात साखरेपेक्षा चढ असणाऱ्या गुळाने आता दरातही साखरेवर मात केली आहे. होलसेल व किरकोळ बाजारांत साखरेपेक्षा गूळ अधिक भाव खात आहे. कोरोनाच्या काळात सेंद्रिय गुळाचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागल्याने त्याचाही दरावर परिणाम दिसून येत आहे.
सांगली, कोल्हापुरात गुळाची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी उत्पादित गुळाला चांगली मागणी असते. पूर्वी ‘गरिबाघरी गूळ, श्रीमंताघरी साखर’ अशी तुलना केली जात होती. आता गुळाने बाजारात प्रतिष्ठा मिळविली आहे. २०१५ पासून गुळाने दरात साखरेपेक्षा अधिक तेजी घेतली आहे. साखरेच्या दरात होणारे चढ-उतार, बेभरवशाचा भाव यांचा विचार केल्यास गेल्या सहा वर्षांपासून गुळाला अधिक भाव मिळत आहे. कोरोनाकाळात गुळाने पोषक तत्त्वांमुळे आपले स्थान अधिक बळकट केले. त्यातही सेंद्रिय गुळाला अधिक पसंती मिळत आहे. चहाच्या टपऱ्यांवरही आता सेंद्रिय गुळाचा चहा विकला जात आहे. त्यामुळे आगामी काळातही गुळाची मागणी व भाव टिकून राहण्याची शक्यता आहे.
चौकट
असा वाढला गुळाचा भाव रुपये प्रतिकिलाे
वर्ष गूळ साखर
२००० १२ १४
२००५ १६ १८
२०१० २७ २८
२०१५ ३४ ३२
२०२० ४५ ३५
२०२१ ५५ ३८
चौकट
गुळाचा चहा बनले स्टेटस
सध्या साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाला जास्त प्राधान्य दिले जाते. पूर्वी साखर परवडत नाही, म्हणून गुळाचा चहा केला जात होता. आता गुळाचा चहा प्रतिष्ठेचा बनला आहे. गुळचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
- गुळात साखरेच्या तुलनेत भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
- गुळाचा चहा घेतल्यास मायग्रेनमध्येही आराम मिळतो, असे म्हटले जाते.
- गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहाही समस्या दूर करतो.
कोट
पूर्वी गुळाचा भाव साखरेपेक्षा कमी असायचा. २०१५ पासून हे भाव उलटे झाले. आता गुळाचा भाव साखरेपेक्षा अधिक आहे. गेल्या काही महिन्यांत गुळाला मागणीही वाढली आहे.
- बाबासाहेब चौगुले, गूळ व्यापारी, सांगली
कोट
सध्या साखरेपासून गुळाची निर्मिती अधिक होत आहे. आरोग्यदायी म्हणून गुळाला मागणीही वाढत आहे. या सर्व गोष्टींमुळे गुळाचे दर साखरेपेक्षा जास्त आहेत. कोरोनाच्या काळात गुळाची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यातही सेंद्रिय गुळाला अधिक भाव आहे.
- बाळासाहेब पाटील, व्यापारी, सांगली
कोट
गुळाचे भाव गेल्या काही वर्षांपासून साखरेपेक्षा जास्त आहेत. गुळाला मागणीही वाढत आहे. चांगल्या प्रतीच्या गुळाला नेहमीच मागणी असते.
- अरविंद हळींगळे, किराणा दुकानदार
कोट
साखरेपेक्षा गूळ हा केव्हाही चांगलाच. रक्त शुद्धीकरण म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनला तो चांगला आहे. ॲनिमिया रुग्णांसाठीही तो फायद्याचा आहे. साखरेने केवळ गोडवा मिळेल; मात्र गुळाने पोषक घटक मिळतील.
- डाॅ. स्मिता पाटील, आहारतज्ज्ञ