लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कधी मोबाईल क्रमांक चुकलेला, कधी मोबाईल बिघडलेला तर कधी संकेतस्थळ, ओटीपीच्या मंदगती कारभाराची अडचण सहन करीत अनेकांना दुसऱ्या डोसकरिता वेटिंगवर रहावे लागत आहे. पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय दुसरा डोस घेता येत नसल्याने अशा अडचणी लोकांना त्रासदायी ठरत आहेत.
दुसरा डोस घेताना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य आहे. त्यामुळे दुसरी लस घेताना या प्रमाणपत्राचा अडथळा अनेकांना येत आहे. ऑनलाईन प्रमाणपत्र कसे घ्यायचे, मोबाईल क्रमांकावर ओटीपी कसा घ्यायचा या गोष्टींची कोणतीही कल्पना नसलेले हजारो लोक जिल्ह्यात आहेत. ते या तंत्रज्ञानापासून दूर आहेत. अनेकांना प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या डोसकरिता जायचे आहे, याचीही कल्पना नसते. त्यामुळे अशा लोकांना लसीकरण केंद्रांवरून परत फिरावे लागते. प्रशासनाने या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोट
अनेकांना मोबाईल हाताळता येत नाही
ज्येष्ठांकडे स्मार्टफोन असतीलच असे नाही. काहींना वयोमानानुसार दिसत नाही, ऐकायला येत नाही. माेबाईलचे फारसे ज्ञान नाही, अशा लोकांसाठी प्रमाणपत्राची प्रक्रिया किचकट आहे. साधी समजेल अशी प्रक्रिया हवी.
- अरुण गायकवाड, सांगली
कोट
आमच्याकडे मोबाईलसुद्धा नाही. मुलांचा मोबाईल क्रमांक आम्ही दिला आहे. मजूर म्हणून राबणाऱ्या कुटुंबांना प्रमाणपत्र कसे? मिळवायचे, हे कळणार कसे? त्यामुळे शासनाने सोपी, सुटसुटीत पद्धत ठेवावी.
- मनगेनी बिरुनगी, सांगली
कोट
कोरोना लसीकरणाचे पहिले प्रमाणपत्र बंधनकारक असले तरी ज्यांना याबाबत कोणतीही अडचण असेल त्यांनी लसीकरण कर्मचाऱ्यांसमोर ती मांडावी. प्रशासकीय स्तरावर लोकांना मदत करण्यात येईल. शक्यतो कोणता मोबाईल क्रमांक नोंदविला आहे, ते लक्षात ठेवावे. नावावरूनही माहिती शोधता येते.
- डाॅ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली
चाैकट
पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास,
मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदल्यास किंवा अन्य कारणाने पहिल्या डोसचे प्रमाणपत्र न मिळाल्यास संबंधितांनी दुसरा डोस घेण्यासाठी मोबाईल, संगणकीय ज्ञान असलेल्या लोकांची मदत घ्यावी. याशिवाय लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना त्यांनी अडचण सांगावी.
चौकट
लसीकरणावेळी ही काळजी घ्या
तुमच्या जवळ असलेला किंवा कुटुंबातील मोबाईल क्रमांक द्यावा. ज्याला मोबाईलमधील इंटरनेट हाताळणी जमते त्याच्याकडून प्रमाणपत्र घेण्यापुरती मदत घ्यावी. यातील पर्याय मिळाला नाही, तर लसीकरण कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी.