घनशाम नवाथेसांगली : गणेशोत्सवात ‘डीजे’च्या दणदणाटामुळे मिरजेत बुधवारी एका भक्ताचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन वर्षांपूर्वी दोघा तरुणांचा मिरवणुकीत दुर्दैवी मृत्यू झाला होता. डीजेच्या दणदणाटापुढे भिंती हलतात, खिडक्यांच्या काचा थरथरतात. मग माणसाच्या नाजूक हृदयाची, कानाच्या पडद्याची काय अवस्था होत असेल सांगता येत नाही. आवाजाच्या भिंतीपुढे हृदयाचा ठोका कधी चुकेल याचा नेम नसतो. आवाजाच्या भिंतीपुढे कार्यकर्ते बेभान होतात; परंतु बंदोबस्तातील पोलिस, मिरवणूक मार्गावरील नागरिक यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते.गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा उत्सव असतो. उत्साहाला आणि जल्लोषाला उधाण येते; परंतु गेल्या काही वर्षांत उत्साह आणि जल्लोषाची व्याख्याच अनेकांनी बदलून टाकली आहे. डीजेचा दणदणाट करून अनेकांच्या कानठळ्या बसवल्याशिवाय उत्सव साजरा करणे अनेकांना मान्यच नसते. उत्सव प्रत्येकवर्षी येत असतो; परंतु मानवी शरीराला मिळालेली ऐकण्याची शक्ती, बघण्याची दृष्टी आणि नाजूक हृदय पुन्हा मिळत नसते. डीजेच्या दणदणाटापुढे भिंती कोसळतात तेथे कानाचे पडदे किती काळ तग धरू शकणार? याचा विचारच कोणी करत नाही. कर्णकर्कश्श आवाजामुळे हृदयाची धडधड वाढून अटॅक आला तर आयुष्यभर हृदयाची काळजी घ्यावी लागते.
दोन वर्षांपूर्वी कवठेएकंद आणि दुधारी येथील तिशीतील तरुणांचा दणदणाटामुळे हृदयाची धडधड वाढून मृत्यू झाला. ऐन तिशीतील तरुणांची ही अवस्था असेल तर वृद्ध मंडळी, रुग्ण आणि लहान मुलांची अवस्था काय होत असेल याचा विचार केल्यानंतरही थरकाप उडतो. मंडळांची इर्षा, वर्चस्व आणि चुरस यामुळे विघ्नहर्त्याच्या उत्सवात विघ्न निर्माण केले जाते. दोन वर्षांपूर्वीच्या दोघांच्या बळीनंतर मिरजेतील एका व्यक्तीचा मिरवणुकीत चित्रीकरण करताना मृत्यू झाला.त्यानंतर त्या व्यक्तीची ॲन्जिओग्राफी झाली होती, तीन ब्लॉकेज होते असा युक्तिवाद काहीजण करत आहेत; परंतु या व्यक्तीचा बळी मिरवणुकीत दणदणाट सुरू असतानाच झाला? हे मान्यच करावे लागेल. मिरवणूक मार्गावरील गल्लीबोळात राहणाऱ्या, बंदोबस्तातील पोलिसांसह अनेकांना हा त्रास असू शकतो. मग दणदणाट करून त्यांचा बळी घेणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आवाजाची मर्यादा ओलांडल्यास गुन्हाजिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यास ध्वनिमापक यंत्र दिले आहे. मंडळांच्या मिरवणुकांमध्ये आवाजाची नोंद घेण्यासाठी अधिकारी व अंमलदारावर जबाबदारी सोपवली आहे. ध्वनिप्रदूषण अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटले पाठवले जातील, असा इशारा अधीक्षक घुगे यांनी दिला आहे.
उत्सवानंतर अनेक रुग्ण उपचारास येतातगणेशोत्सवानंतर कानाचा पडदा फाटणे, बधिरपणा तसेच हृदयाशी संबंधित त्रास होऊ लागल्यामुळे अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये निदानासाठी येतात. तसेच लेझरमुळे डोळ्यांना इजा झाल्याचे अनेक रुग्ण नेत्ररोगतज्ज्ञाकडे दाखल होतात. निदान झाल्यानंतर अनेकांना कायमस्वरूपी त्रास घेऊन जगण्याचा सल्ला कानावर पडतो.
पोलिसांनाही होतो त्रासमिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस, होमगार्ड हे अग्रभागी असतात. कर्णकर्कश आवाज आणि लेसरच्या झगमगाटामुळे त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. उत्सवानंतर अनेक पोलिसांना तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते. त्यामुळे पोलिसांना कानात बोळे घालून बंदोबस्ताचा सल्ला दिला जातो.
मिरजेतील व्यक्तीचा मिरवणुकीत मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे. आवाजाच्या दणदणाटामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यास आणि नातेवाइकांची तक्रार असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संबंधितांवर दाखल केला जाईल. - संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली.
कानावर ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज सहन करता येत नाही. डीजेचा आवाज १२० डेसिबलपेक्षा जास्त असतो. त्यामुळे कानाचे पडदे फाटू शकतात. नसांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वनाद म्हणजे कानात सतत गुणगुणल्यासारखा आवाज येणे असा त्रास होतो. कायमस्वरूपी चक्कर येणे, बधिरपणा असाही त्रास होतो. तो आयुष्यभर घेऊन जगावे लागते. काहीवेळा जास्त कंपनांमुळे हृदयही बंद पडू शकते. - डॉ. अशोक पुरोहित, नाक, कान, घसातज्ज्ञ, सांगली.