इस्लामपूर: येथील ताकारी रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या पुढे चौकात हॉटेलमधील कामगारास दोघांनी काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. अक्षय लक्ष्मण सालेलकर (२०, रा. निनाईनगर) असे जखमीचे नाव आहे.
सालेलकर याने पोलिसात तक्रार दिली आहे. यावरून शिवाजी आण्णा भोसले आणि त्याचा साथीदार सचिन दिनकर देसाई (दोघे रा. हनुमाननगर, इस्लामपूर) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे दोघे रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. मालकाने ८ नंतर इथे बसून जेवण्यास मनाई आहे. त्यामुळे पार्सल दिले जाईल, असे सांगितले. तेव्हा दोघांनी इथेच बसून जेवणार असे म्हणत मालकाला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले. यावेळी कामगार सालेलकर हा मध्ये आल्यावर त्याला या दोघांनी काठीने हातावर, मनगटावर मारून जखमी केले. हवालदार श्रीकांत अभंगे अधिक तपास करीत आहेत.