अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनामुळे गेल्या वर्षभरात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांची (इम्युन हेल्थ सप्लिमेंटस्) जगभरात ११.६ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. औषध उद्योगातील विविध संस्थांच्या अंदाजानुसार २०२१ मध्येही यात आणखी १० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
अमेरिकेतील बिझनेस इनसाइट या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१७ ते २०१९ या वर्षातील रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांची उलाढाल काहीशी स्थिर होती. २०२० मध्ये त्यात अचानक ११.६ टक्के वाढ झाली. २०२१ मध्ये यात आणखी १० टक्के वाढ होऊ शकते. २०२० मध्ये जागतिक स्तरावर १८.२२ बिलियन डॉलरची म्हणजेच १ लाख ३४ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. २०२१ मध्ये हीच उलाढाल २०.१८ बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. २०२८ पर्यंत या औषधांची बाजारपेठ ३१.५० बिलियन डॉलरची होईल, असा अंदाज आहे.
भारत, चीनसह आशियाई कंपन्यांचा या औषध उद्योगातील वाटा अमेरिकेच्या तुलनेत कमी आहे. सध्या या औषधांच्या एकूण उलाढालीतील उत्तर अमेरिकेतील औषध कंपन्यांचा वाटा ६५.८ टक्के इतका आहे.
कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी अनेक औषधी बाजारात आली. ज्यामध्ये ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक औषधांचा समावेश आहे. जगातील अनेक नामांकित औषध कंपन्यांना कोरोना काळातील गरज ओळखून नवी रोगप्रतिकारक औषधी बाजारात आणली. लिक्विड, पावडर, गोळ्या या स्वरूपातील ही औषधी आता मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहेत. अमेरिकेच्या तुलनेत चीन व भारताचा सध्या या प्रकारच्या औषधनिर्मितीमधील वाटा कमी असला तरी गेल्या वर्षभरात या दोन्ही देशांकडूनही या औषधांचे उत्पादन वाढत आहे.
चौकट
आयुर्वेदिक औषधनिर्मितीला बळ
मॉर्डर इंटेलिजन्स संस्थेने दिलेल्या अहवालानुसार चिनी औषधांसह भारतीय आयुर्वेदिक औषधांकडे अनेक देशांचा व नागरिकांचा कल वाढत आहे. त्यामुळे स्थानिक व जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारही अशा औषधनिर्मितीत भाग घेण्याची चिन्हे आहेत.
कोट
कोराेना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधांना मागणी वाढली आहे. त्यामुळे अशा औषधांचे भारतातील उत्पादन व त्यांची निर्यात वाढण्याची चिन्हे आहेत. भारतीय औषधांनी जागतिक स्तरावर अधिक विश्वासार्हता मिळविल्याने त्याचे चांगले परिणाम दिसतील.
- महेश दोशी, अध्यक्ष, इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.