कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे समर्थकांत जोरदार हाणामारी झाली. या मारामारीत तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, रविवारी पहाटे घडली. या मारामारीप्रकरणी नऊजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारामारीने तालुक्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दोन दिवसांपूर्वी नांगोळे येथे संत बाळूमामा यात्रेनिमित्त गृहमंत्री आर. आर. पाटील समर्थक सचिन हुबाले आणि घोरपडे समर्थक रावसाहेब शिंगाडे यांच्यात किरकोळ वादावादी झाली होती. यातून आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्यादरम्यान सचिन हुबाले, अरविंद हुबाले, किसन हुबाले, बिरदेव हुबाले, राजाराम हुबाले, बापू हुबाले, शिवाजी हुबाले, कृष्णा हुबाले या नऊजणांनी रावसाहेब शिंगाडेच्या घरावर हल्ला केला. त्यांनी लोखंडी पाईप, काठ्यांनी रावसाहेब शिंगाडे, त्यांचा भाऊ बाळू आणि वडील विलास यांना मारहाण करून जखमी केले. त्यांना मिरजेतील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. सकाळी गावात मोठी हाणामारी झाल्याची माहिती कळताच एकच खळबळ माजली. जखमी शिंगाडे पिता-पुत्रांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांनी नऊजणांविरोधात फिर्याद दिली. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेटे करीत आहेत. (वार्ताहर)संघर्षाची सुरुवात...विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन—तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यामध्ये संघर्ष उफाळून आला असून, नांगोळेची हाणामारी ही सुरूवात आहे की काय, अशी चर्चा तालुक्यात सुरू होती. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याचे बोलले जात आहे.
गृहमंत्री-घोरपडे समर्थकांत मारामारी- संघर्षाची सुरुवात...
By admin | Updated: July 28, 2014 00:00 IST