कवठेमंहाकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यामधील सर्व तमाशा कलावंत व उमा बाबाजी हंगामी तमाशा कलाकार संघटना, सांगली यांच्यातर्फे विविध मागण्यांसाठी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द झाले. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, यासाठी जत्रा रद्द करण्यात आल्या. परिणामी तमाशाचे कार्यक्रम बंद पडले. त्यामुळे गेले दीड वर्षे या कलाकारांना उपासमारी सहन करावी लागत आहे. शासनाने एका नव्या पैशाचीही मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तमाशा कलाकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर सदाकळे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कलावंतांना दरमहा पाच हजार रुपये द्यावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बी. जे. गोरे यांना देण्यात आले.
आंदाेलनात उमा बाबाजी हंगामी तमाशा कलाकार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भास्कर सदाकळे, मंगेश सकट, आगर नागरकर, रुबाब सौंदडे, लंका पाचेगावकर, तानाजी लोखंडे, छाया वाघमारे, सदाशिव सौंदडे यांच्यासह लोककलावंत सहभागी झाले होते.