सांगली : होलार समाजाने आपल्या न्यायहक्कासाठी आता रस्त्यावर उतरणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन होलार समाज समन्वय समितीचे प्रदेशाध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी व्यक्त केले.
समाजाचे उत्तरार्धकर्ते, समाजभूषण वि.दा. ऐवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित मेळाव्यात राजाराम ऐवळे बोलत होते. ते म्हणाले, समाजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ३० लाखांवर लोकसंख्या आहे. परंतु जातीच्या चुकीच्या नोंदीमुळे शासन दरबारी निश्चित आकडा दिसून येत नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षात समाजाची दखल घेतली जात नाही म्हणून युवकांनी, महिलांनी मोठ्या संख्येने आक्रमकपणे रस्त्यावर उतरून शासनास समाजाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून नोंदविलेल्या चुकीच्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. गेली कित्येक वर्षे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांच्यासोबत संघटना बैठका आयोजित करून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण शासनाकडून फक्त आश्वासनेच मिळतात; पण कृती घडताना दिसत नाही.
यावेळी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव सिद्राम जाबीर, जिल्हा अध्यक्ष आनंदराव ऐवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते विजयराव केंगार, युवानेते दीपक हेगडे, तालुकाध्यक्ष गणेश भजनावळे, महादेवराव कांबळे, शुभम ऐवळे, अमितकुमार केंगार, दर्शन ऐवळे, महिला आघाडीच्या मंगल ऐवळे, रूपाली ऐवळे, छायाताई ऐवळे आदी उपस्थित होते.