खानापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा कडक निर्बंध लागू झाले आहेत. यामुळे दररोज मजुरी करून जगणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी अजित शिंदे यांनी पश्चिम बंगाल गलाई असोसिएशनच्या माध्यमातून कोलकाता शहरातील विविध भागांत ५०० गरजू नागरिकांना जेवण व पाणी वाटप केले.
बेणापूर येथील दिवंगत बाळासाहेब शिंदे यांच्यापासून सुरू झालेली सामाजिक जबाबदारी त्यांचे सुपुत्र दिवंगत रावसाहेब शिंदे व दिवंगत मालोजीराव शिंदे यांनी चालविली. त्यांच्या पश्चात त्यांचे नातू जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे यांचे मोठे बंधू, पश्चिम बंगाल गलाई बांधव असोसिएशनचे अध्यक्ष अजित शिंदे यांनी तो वारसा चालविला आहे.
अजित शिंदे यांनी गलाई बांधव असोसिएशनच्या सहकार्यातून सुरू केलेला ‘एक घास माणुसकीचा, मराठी माणसाचा’ हा उपक्रम अनेकांना लाभदायी ठरला आहे. यावेळी पश्चिम बंगाल गलाई बांधव असोसिएशनचे सचिव लक्ष्मण खंदारे, राम चव्हाण, संतोषशेठ चव्हाण, नेताजी पवार, विंकी बाबू, सनी बाबू, उत्तमशेठ जरे उपस्थित होते.