लोकमत न्यूज नेटवर्क
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) व शिराळा उत्तर भागात मृग नक्षत्रातील पहिल्याच चरणात जोरदार पाऊस पडला. यामुळे छोटे बंधारे, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले.
बुधवारी रात्रभर व गुरुवारी दिवसभर वाटेगाव, भाटवाडी, शेणे, शिराळा उत्तर भागातील गिरजवडे, पनुब्रे, घागरेवाडी, मोंडेवाडी, टाकवे, पाचुंब्री, बांबवडे, शिवरवाडी, भैरववाडी परिसरात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये धूळवाफ पध्दतीने भुईमूग, भात, सोयाबीन, मका बियाणे याची पेरणी केल्याने बी उगवणीला पोषक असा पाऊस झाला आहे. तसेच ज्यांची पेरणी, टोकनी राहिली आहे, असे शेतकरी पाऊस पडल्याने समाधानी झाले आहेत.
दि. ६ जूननंतर दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरातील छोटे बंधारे भरल्याने ओढे नाले भरून वाहत आहेत. यामुळे वाटेगाव येथील पूर्वाश्रमी भोगावती नदी सध्याचा मुख्य ओढा दुथडी भरून ओसंडून वाहत आहे.