सांगली : बेडग रस्त्यावरील महापालिकेच्या कत्तलखान्याच्या परवानगीवर चर्चेसाठी जिल्हा परिषदेत बुधवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. याबाबतचे पत्र जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलींद पोरे यांनी काढले. महापालिका, ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह मिरज पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींनाही उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
कत्तलखान्याचा परवाना रद्द करावा यासाठी मिरज पंचायत समिती आक्रमक आहे. वड्डी ग्रामपंचायतीनेही तशी मागणी केली आहे. पंचायत समितीच्या अनेक मासिक बैठकांत या विषयावरुन वादंग झाला आहे. गेल्या महिन्यानीतल मासिक बैठकीला डॉ. पोरे उपस्थित होते. त्यांच्यापुढेही सदस्यांनी परवाना रद्दसाठी आग्रह धरला. पोरे यांनी सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार बुधवारी बैठक होत आहे.
कत्तलखाना वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. स्वच्छतेचे निकष व नियम पाळले जात नसल्याने कत्तलखान्यामुळे प्रदूषण होत नसल्याची तक्रार पंचायत समिती व ग्रामपंचायतीने वारंवार केली आहे. कत्तलखान्यातील मांसावर पोसलेल्या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत एका बालिकेचा बळी गेला आहे, तर असंख्य ग्रामस्थ व प्रवासी जखमी झाले आहेत. कत्तलखान्याच्या परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असाही आक्षेप ग्रामपंचायतीने घेतला आहे. जितकी परवानगी दिली, त्याहून अधिक जागा वापरली जात आहे, तसेच परवानगी न घेता काही कामे सुरु आहेत अशीही तक्रार ग्रामपंचायतीने केली आहे. या सर्व बाबींवर बुधवारच्या सुनावणीदरम्यान चर्चा अपेक्षित आहे. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यादेखील यावेळी उपस्थित राहतील.