इस्लामपूर : गेल्या दीड वर्षांपासून शहरामध्ये गाजत असलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या विरोधातील दाखल झालेल्या अपिलांवर मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात झाली. शहरातील १६ हजार मालमत्ताधारकांनी या करवाढीला हरकत घेत अपिल दाखल केले आहेत. पहिल्या दिवशी ३५२९ मालमत्ताधारकांच्या अपिलांवर सुनावणी झाली.
येथील पालिकेच्या नाट्यगृहात मालमत्ता कर अपिल समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी नागेश पाटील, सोलापूरच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक व्ही. बी. शेंडे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विरोधी पक्षनेते संजय कोरे व महिला बालकल्याण समिती सभापती जयश्री माळी या पाच जणांच्या समितीसमोर ही सुनावणी सुरू आहे.
गुरुवारपर्यंत या अपिलावर सुनावणीचे कामकाज सुरू राहणार आहे. मंगळवारी पहिल्या चार प्रभागातील ३५२९ मालमत्ताधारकांनी अपिल समितीसमोर म्हणणे मांडले. या सुनावणीसाठी अपिल केलेल्या मालमत्ताधारकांनी म्हणणे समितीसमोर मांडावे, असे आवाहन नागेश पाटील यांनी केले आहे.