लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : आतापर्यंत लोकप्रतिनिधी आणि सरकारने डोंगरी विभागाकडे दुर्लक्षच केले असून आत्तातरी लक्ष देण्यात यावे, अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, असे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांनी केले.
कोकणेवाडी (ता. शिराळा) येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी, तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रमावेळी तानाजीराव सावंत बोलत होते. ते म्हणाले की, कोकणेवाडीच्या गावाला भूस्खलनाचा धोका असल्याने येथील ग्रामस्थांना शासनाने गुढे पाचगणी येथे स्थलांतरित केले होते; परंतु त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू किंवा सुविधांचा पुरवठा केला नव्हता. सध्या तेथील नागरिक आपापल्या घरी आले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पश्चिम भागातील कित्येक वाडी, वस्त्या व गावे डोंगरात वसली आहेत. इकडे फक्त निवडणुकीवेळीच पाहिले जाते. त्यांच्या सोई सुविधेकडे दुर्लक्ष केले जात आहे. यापुढे मी स्वतः लक्ष घालून डोंगरी भागातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
डॉ. अमोल कारेकर, केदार खापरे, मोहन चौगुले, अनुप माजगावकर, परशुदादा साबळे, योगेश जबगौडर, उदय पुजारी, तालुका अध्यक्ष संजय पाटील, अमर सावंत, भास्कर रांजवन उपस्थित होते.