लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह नेत्यांनी महापौरपदी निवड करताना मुदत संपल्यावर आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार नेत्यांनी शब्द पाळावा व मला आणखी सहा महिने मुदत द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे महापौर गीता सुतार सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
महापौर गीता सुतार यांची मुदत २१ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन महापौर निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपसह विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील इच्छुकांनीही यासाठी फिल्डिंग लावली आहे. महापौर पद आता खुल्या प्रर्वगासाठी असल्याने इच्छुकांची संख्या वाढत आहे. नेत्यांच्या गाठी-भेटी सुरू आहेत. पक्षांनीही इच्छुकांची मते आजमावण्याचे काम सुरू केले आहे. महापौर पदाच्या या स्पर्धेत आता विद्यमान महापौर गीता सुतार यांनीही एंट्री केली आहे.
सुतार म्हणाल्या, महापौरपदी माझी निवड करताना नेत्यांनी मला आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातच कोरोनामुळे गेली आठ ते दहा महिने काम करता आले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मला सहा महिने मुदतवाढ देण्याचा शब्द दिला होता. त्यावेळी शेखर इनामदारही उपस्थित होते.
चौकट
भाजपची आज बैठक
भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक बुधवारी होत आहे. यावेळी नेतेमंडळींही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मी मुदवाढीचा विषय उपस्थित करणार असल्याचे सुतार यांनी सांगितले.