सांगली : एलबीटीप्रश्नी व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून आंदोलन हाती घेतले असताना, आज बुधवारी पूर्वसंध्येला महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा टाकला. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. नागरिक व ग्राहकांनी पालिकेच्या कारवाईचे स्वागत केले, तर व्यापाऱ्यांनी मात्र नाराजीचा सूर आळवला. महापालिकेचे सहायक आयुक्त रमेश वाघमारे, आप्पा हलकुडे यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमणविरोधी पथकाने दुपारी दोननंतर शहरातील बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. राजवाडा चौक, पटेल चौकातील सिंधी मार्केट येथे दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे काढण्यात आली. बालाजी चौक, गणपती पेठेत अनेक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर व्यवसाय मांडला होता. दुकानाच्या बाहेरील बाजूस रस्त्यावर साहित्य मांडले होते. अनेक दुकानदारांच्या छपऱ्या बाहेर आलेल्या होत्या. नसीर जांभळीकर, समीर जमादार व इतर कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटविली. पालिकेच्या पथकाने कारवाईला सुरुवात करताच व्यापाऱ्यांत धावपळ उडाली होती. अतिक्रमणविरोधी पथक पोहोचण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेरील माल आत नेण्यासाठी धावाधाव केली. बालाजी चौकातील चर्चलगतच्या खोकीधारकांनी पाच फुटापेक्षा अधिक लांबीच्या छपऱ्या मारल्या होत्या. पथकाने या छपऱ्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईने या रस्त्याने बऱ्याच वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. एका व्यापारी नेत्याच्या दुकानाजवळ अतिक्रमण पथक आले. तोपर्यंत या नेत्याने साहित्य दुकानात घेतले होते. व्यापारी व पालिकेचा कोणताही वाद नाही, अशी कारवाई करून दहशत माजवू नका, असे आवाहनही त्या नेत्याने केले. पण पथकाने त्याला फारसा प्रतिसाद न देता कारवाईचा धडाका सुरूच ठेवला. या कारवाईतून प्रभाग सभापती बाळासाहेब काकडे यांना सवलत मिळाली नाही. त्यांच्या दुकानाबाहेरची छपरीही काढून टाकली. गुरुवारपासून व्यापाऱ्यांनी आंदोलन हाती घेतले आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच महापालिकेने बाजारपेठेतील अतिक्रमणांवर हातोडा टाकला. (प्रतिनिधी)
सांगलीत अतिक्रमणांवर हातोडा
By admin | Updated: March 26, 2015 00:01 IST