रिॲलिटी चेकशीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लसीकरण केंद्रावर उडालेली झुंबड, ऑनलाइन नोंदणी नसल्याने तरुणांची होणारी ससेहोलपट अशा स्थिती हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषत: १८ ते ४४ वयोगटांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अजूनही पूर्ण झालेले नाही. जवळपास ६० टक्के हाॅटेल कर्मचारी अजूनही लसीकरणापासून वंचित आहेत.
शहरातील हाॅटेल, रेस्टाॅरंटला रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. शासनाने हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे बंधन घातले आहे. साधारणत: शहरातील ६० टक्के हाॅटेल कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दुसऱ्या डोस घेतलेल्यांची संख्या १५ ते २० टक्के इतकी आहे.
चौकट
काहींचे लसीकरण पूर्ण, काहींचे बाकी
हाॅटेल १ - कोल्हापूर रस्त्यावरील एका हाॅटेल चालकांची तीन ते चार हाॅटेल्स आहेत. त्याच्याकडे १०८ कर्मचारी काम करतात. त्यापैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांचेच लसीकरण पूर्ण झाले आहे.
हाॅटेल २- पुष्पराज चौकातील एका हाॅटेलमध्ये ४० हून अधिक कर्मचारी आहेत. तिथे तरुण कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. या कर्मचाऱ्यांचेही लसीकरण अद्याप झालेले नाही.
चौकट
स्थानिकांनाच लस नाही, मग कर्मचाऱ्यांना कुठे मिळणार?
स्थानिक नागरिकांना कोरोनाची लस मिळत नाही. तिथे हाॅटेल कर्मचाऱ्यांना कोण विचारते? अनेक कर्मचारी परराज्यातील आहेत. त्यांनाही लस मिळत नाही. संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे याबाबत मागणीही केली आहे. लसीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- शैलेश पवार, अध्यक्ष, हाॅटेल चालक, मालक संघटना.
चौकट
लसीकरण झाले की नाही, तपासणार कोण?
हाॅटेल कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अथवा दोन्ही लसीचे बंधन आहे. या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी महापालिकेकडूनही नियोजन केले जात आहे. उपलब्ध लसींची संख्या व कर्मचाऱ्यांची संख्या याचे गणित घालून लस दिली जात आहे.
- राहुल रोकडे, उपायुक्त, महापालिका.
चौकट
शहरातील हाॅटेल्स : ९००
सध्या सुरू असलेली हाॅटेल्स : ९००
हाॅटेल कर्मचाऱ्यांची संख्या : २० ते २५ हजार
चौकट
रस्त्यावर टपऱ्यांवर आनंदी आनंद
- शहरातील रस्त्यावर हातगाडींवर खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवसाय जोमात सुरू आहे. जवळपास ५ हजारांहून अधिक हातगाड्या आहेत.
- या हातगाड्यांवर तरुण कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नाही.
- हातगाडीच नव्हे, तर टपऱ्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.