सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील नदीत बेकायदा वाळू उपसा केल्याप्रकरणी जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील संतोष मनोहर खामकर या ठेकेदाराविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचा कर चुकवून १२० ब्रास वाळूचा त्याने यांत्रिकी बोटीद्वारे उपसा केला आहे. त्याची किंमत एक लाख ३२ हजार रुपये आहे. महसूल विभागाचे सुनील जयसिंग व्हटकर (रा. सुभाषनगर, मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. खामकर याला कोल्हापूर जिल्ह्यात वाळू उपसा करण्याचा परवाना आहे. मात्र त्याने सांगली हद्दीत हरिपुरात घुसून वाळू उपसा केल्याचे निष्पन्न झाले आहे. २१ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता वाळू उपसा करताना त्यास पकडण्यात आले. याप्रकरणी खामकरविरुद्ध काल, बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मिरज प्रांताधिकाऱ्यांनी आज, गुरुवारी रात्री हरिपुरात छापा टाकून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन ठेकेदारांना वाळू उपसा करताना रंगेहात पकडले. यावेळी उपसा करण्यासाठी वापरलेल्या दोन यांत्रिकी बोटी, दोन ट्रक व अन्य साहित्य जप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. यामुळे याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून जप्तीची कारवाई सुरू होती. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)
हरिपुरात वाळू उपसा; यांत्रिकी बोटी जप्त
By admin | Updated: March 27, 2015 00:54 IST