सांगलीच्या शिवोदयनगरमध्ये अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण, तर अर्धा रस्ता मुरुमाचा बनविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वसंतदादा कारखाना परिसरातील अनेक रस्ते ड्रेनेजसाठी खोदल्यानंतर त्यावर केवळ मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. शिवोदयनगर परिसरात एकाच रस्त्याचा अर्धा भाग डांबरी तर अर्ध्या भागात मुरुमाचा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांतून महापालिकेच्या तसेच ठेकेदाराच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
सांगलीतील उपनगरांमध्ये गेल्या वर्षांपासून ड्रेनेजच्या खोदाईचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. ड्रेनेजचे काम झाल्यानंतर खड्डे केवळ मातीच्या भरावाने भरले जात आहेत. महापालिकेकडे नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर केवळ मुरुमाचा भराव टाकून मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे थोड्या पावसातही या रस्त्यांवर दलदल निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होतो. सांगलीच्या शिवोदयनगरमधील रस्त्यांची कामे तर विचित्र पद्धतीने केली आहेत. काही एकाच रस्त्याचे अर्धे डांबरीकरण, अर्धे मुरुमीकरण केले आहे. काही रस्त्यांच्या रुंदीपेक्षा निम्म्या रुंदीच्या मुरुमाचा भराव टाकला आहे. त्यामुळे परिसरात या मार्गावरून जाताना अपघात होत आहेत. नागरिकांनी याबाबत तक्रारीही केल्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. लक्ष्मीनगर, पंचशीलनगर, शांतिनिकेतनच्या पिछाडीस असलेल्या अनेक रस्त्यांवरही नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.