बाबासाहेब परीट
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील प्रयोगशील शेतकरी आण्णा परीट यांच्या रत्नागिरी हापूस आंब्याच्या फळांचे वजन चक्क ५५० ग्रॅम भरले. कोणतीही रासायनिक फवारणी न घेता केवळ सेंद्रिय पद्धतीने वाढवलेल्या आंब्यांची कृषी विभागाने दखल घेतली आहे.
अण्णा परीट कोरडवाहू शेतकरी असून, त्यांनी तीस वर्षांपूर्वी कोकणातून रत्नागिरी हापूस आंब्याच्या जातीची सुमारे ६० कलमी रोपे आणली होती. एक बाय एक मीटर व एक मीटर खोल खड्डा काढून त्यामध्ये शेणखत व कंपोस्ट खत घालून लागण केली. दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावरून घागरीने पाणी आणून घातले. दरवर्षी शेणखत वापरले.
यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात लागला आहे. झाडांची उंची सुमारे पंचवीस फूट आहे. यंदा मोहोर आला व फळधारणाही चांगली झाली आहे. अत्यंत उच्च प्रतीच्या आंब्यांना रंग व चवही चांगली आहे. सर्व फळांचे सरासरी वजन साडेचारशे ग्रॅम, तर काही फळांचे वजन साडेपाचशे ग्रॅम आहे.
याबाबत परीट म्हणाले की, ढगाळ वातावरण व पावसाच्या माऱ्यामुळे बागेचे नुकसान झाले आहे. परंतु तत्पूर्वी थोड्या प्रमाणात आंबा काढला आहे. मोहर लवकर येण्यासाठी प्रयोग करीत आहे. त्याबद्दल कृषी विभागाकडून सल्ला घेत आहे.
कोट
अण्णा परीट यांच्या शेतातील हापूस आंबा उत्तम दर्जाचा आहे. एवढ्या वजनाचा हापूस आंबा शिराळा तालुक्यात प्रथमच पिकत आहे. सेंद्रीय खतांच्या वापरामुळे हे शक्य झाले आहे.
- श्रीशैल नारोबा अजेटराव, बी. एस्सी. (हाॅर्टिकल्चर)