आटपाडी : आटपाडीसह तालुक्यात गुरुवारी दुपारी मेघगर्जनेसह गारांच्या वळिवाने सुमारे अर्धा तास झोडपून काढले. विजेच्या तारांवर झाडे पडली, अनेक ठिकाणी तारांवर तारा चिकटल्याने सर्वत्र वीजपुरवठा ठप्प झाला. शेतीचेही नुकसान झाले.
गुरुवारी दुपारी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह गारांच्या तडाख्यांनी सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. शेरेवाडी (ता. आटपाडी) येथे ४२ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसातील गारांच्या तडाख्याने, जोरदार वाऱ्याने डाळिंबांचे नुकसान झाले. डाळिंबांची फळे, फुले जमिनीवर पडली. अनेक शेतकऱ्याची वैरण भिजली. दरम्यान, अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. तारांवर तारा घासल्याने तारा अडकल्याने वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत वीज कर्मचारी अंधारात खांबावर चढून वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी दुरुस्तीचे काम करत होते.
वीज वितरणचे अभियंता संजय बालटे म्हणाले, जोरदार वाऱ्यामुळे सर्वत्र झाडांनी तारांवर पडून नुकसान केले आहे. दिघंची ते आटपाडी अशी मुख्य वाहिनी सुरळीत करून नंतर इतरत्र वीजपुरवठा सुरू केला जाईल.