कापूसखेड गावातील मुख्य रस्त्यावरच गटारीचे पाणी साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेडमार्गे नेर्ले येथे जाणाऱ्या कापूसखेड गावातील मुख्य रस्त्यावरच गटारीचे पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे, तर या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षभरापासून हा रस्ता वादाच्या भाेवऱ्यात सापडला आहे.
याबाबत माहिती अशी, कापूसखेड (ता. वाळवा) या गावातूनच नेर्ले व पुढे कराडला जाता येते. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकीमधून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. कापूसखेड गावातील गटारीच्या पाण्याचे नियोजन झालेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सर्व पाणी मुख्य रस्त्यावरच साचून मोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. येथील काही जमीन मालक आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरच तुंबून राहिले आहे. त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.
ग्रामपंचायत आणि खाजगी शेतमालक यांच्यातील वाद मिटला आहे. हा रस्ता बांधकाम विभागाकडे असल्याने या विभागाने रस्ता करावा असे आदेश दिले आहेत. तरीही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. कापूसखेड गाव शिराळा मतदारसंघात येते. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत, तर माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी या रस्त्याची पाहणी केल्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी या रस्त्यावरून जाण्यापेक्षा अन्य मार्गाने जाणे पसंत केले.
कोट
कापूसखेड या गावाचा भाैगोलिक विचार केला, तर पश्चिम दिशेला उतार आहे. त्यामुळे गटारीचे पाणी त्या दिशेकडे जाते; परंतु हे पाणी खासगी शेतात गेल्याने शेतकरी न्यायालयात गेले होते. आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. रस्त्यावरील पाण्याचे लवकरच नियोजन होईल.
संपतराव पाटील, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती.