सांगली : कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने उपचाराची सोय करताना प्रशासनाची कसरत होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यावेळीही तातडीने कोविड केअर सेंटर्स सुरू केली असली तरी रुग्णांकडून रुग्णालयातच उपचारासाठी प्राधान्य दिले जात आहे. होम आयसोलेशनची सोय नसलेल्या आणि सौम्य अथवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनी कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावे यासाठी प्रशासनाचे नियोजन आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने प्रशासनाने तातडीने प्रमुख कोविड रुग्णालये व डेडीकेटेड रुग्णालये सुरू केली आहेत. तर तालुका आणि महापालिका क्षेत्रात ‘ट्रीपल सी’ अर्थात कोविड केअर सेंटर्सही चालू केली आहेत. मात्र, अनेकांकडून तिथे दाखल होण्याऐवजी रुग्णालयातच दाखल होण्यासाठी आग्रह केला आहे. त्यामुळे कोविड सेंटर सुरू होऊनही त्या ठिकाणी दाखल बाधितांची संख्या तुलनेने कमी आहे. रुग्णालयातही बेडची संख्या कमी होत असताना आता रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाल्यास यंत्रणेवरील ताणही कमी होण्यास मदतच होणार आहे.
चौकट
जिल्ह्यात ११ ठिकाणी कोविड सेंटर
प्रशासनाने जिल्ह्यात ११ ठिकाणी कोविड केअर सेंटर्स सुरू केली आहेत. या ठिकाणी ८५४ बेड्सची सोय आहे. ऑक्सिजनसह इतर सुविधा नसल्याने रुग्णांकडून रुग्णालयास प्राधान्य देण्यात येत आहे.
चौकट
सौम्य लक्षणे तरीही रुग्णालयात
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत सध्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात बेड्सपेक्षा दाखल रुग्णांची संख्या वाढत असल्याने ताण वाढला आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.
चौकट
बेड्स मिळविण्यासाठीच धडपड
कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांसाठी अधिक सुविधा देण्यात येतात. तालुका पातळीवर उपचाराची सोय झाल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे. तरीही रुग्णालयातच बेड मिळावा यासाठी धडपड सुरू असते.
कोट
कोविड केअर सेंटरमध्येही चांगले उपचार सुरू आहेत. तसेच अजूनही काही सुविधा देण्याबाबत प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तरी सौम्य लक्षणे अथवा लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांनी कोविड सेंटरमध्येच दाखल व्हावे.
डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक
चौकट
कोविडग्रस्तांवर उपचार करणारे रुग्णालये
५६
एकूण बेड २८१२
ऑक्सिजन बेड २४५४
रिकामे ऑक्सिजन बेड---
कोविड सेंटर ११
एकूण बेड ८५४
रिकामे बेड ५४८