संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: तब्बल १० सरकारी नोकऱ्या पाठीवर टाकत सांगलीच्या योगेशकुमार पुस्तके याने थेट क्लासवन अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. येत्या १ सप्टेंबरपासून तो सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू होत आहे. अनाथ आरक्षणातून प्रथमवर्ग अधिकारी बनलेला तो पहिलाच तरुण ठरला आहे.
सांगलीच्या दादूकाका भिडे बालगृहात लहानाचा मोठा झालेल्या योगेश याने अत्यंत परिश्रमपूर्वक हे यशोशिखर गाठले आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात खातवळ हे त्याचे गाव. त्याच्या लहानपणीच आई-वडील निवर्तल्याने आटपाडीच्या आजोबांनी त्याला चांगल्या शिक्षणासाठी सांगलीत बालगृहात दाखल केले. दहावीला ८५ टक्के गुणांनंतर तंत्रनिकेतनमधून पदविका अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे आष्टा येथून बी.ई. पूर्ण केले. १८ वर्षे पूर्ण झाल्याने बालगृह सोडावे लागणार होते, विशेष बाब म्हणून बालगृहात राहण्यास परवानगी दिली.
योगेशने गवसणी घातलेली अधिकारी पदे
तलाठी, म्हाडामध्ये लिपिक, जीएसटीमध्ये निरीक्षक, नगरपालिकेत कर निर्धारण अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी, कर सहायक, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अशा पदांपर्यंत त्याने यश मिळविले.सध्या तो बीडमध्ये महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी या द्वितीय श्रेणी पदावर काम करत आहे.
यश मिळाले तरी तो थांबला नाही
तो स्पर्धा परीक्षा देत राहिला. यशही मिळवत गेला. विविध १० सरकारी पदांना पाठीवर घेत आता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (वर्ग १) या पदावर रुजू होत आहे. योगेश याला सनाथ संस्थेच्या गायत्री पाठक आणि नारायण इंगळे, मिलिंद कुलकर्णी यांचीही साथ मिळाली.सुरुवातीला काही सरकारी पदांवर कामही केले, पण प्रथमवर्ग अधिकारी पदाचे स्वप्न खुणावत होते. त्यामुळे अभ्यास करत राहिलो. त्यातूनच प्रथमवर्ग अधिकारी पदाला गवसणी घालता आली.योगेश पुस्तके, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी