सांगली : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचे सरकार येण्यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि माझे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत दिली. सध्याचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असेही ते म्हणाले.
पत्रकारांना त्यांनी सांगितले की, मुंबईत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी उभी केली गेली. गाडीमालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. राज्यात दलितांवर अत्याचार वाढताहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. राज्य सेवेच्या पूर्वपरीक्षा झाल्या पाहिजेत, त्या आता पुढे ढकलू नयेत. राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. आठ जिल्ह्यांत गंभीर स्थिती आहे. सरकारने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. लोकांनीही मास्कचा वापर करावा.
आठवले म्हणाले की, नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यातील परिस्थिती बिघडत राहिली, तर त्याचा विचार करायला हरकत नाही. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू नये, अशी आमची इच्छा आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी ठाकरे सरकारने लक्ष द्यावे. मराठा आरक्षणासाठी आम्ही सहमत आहोत. सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा आहे. आरक्षणासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मागणी केली आहे.