म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील कोविड सेंटरमधील रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज केदारराव शिंदे यांनी विविध माध्यमातून मदत केली.
शिंदे यांनी गावातील काही संस्था व हाॅटेल मालकांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार लक्ष्मी बँकेकडून पाच लिटर सॅनिटायझर व शंभर मास्क देण्यात आले. शंकरराव शिंदे पतसंस्थेकडून व म्हैसाळ दूध पुरवठा संस्थेकडून रुग्णांना चहा, नाष्टा व जेवण देण्यात येणार आहे. म्हैसाळमधील सर्व हॉटेल्स मालकांकडून प्रत्येकी एक दिवसाचे चहा, नाष्टा व जेवण देण्यात येणार आहे.
शिंदे म्हणाले, गावात सुमारे दोनशेहून अधिक रुग्ण घरी उपचार घेत आहेत. त्यातील अनेक जण गरीब आहेत. ज्यांना घरी जागा नाही, कोणतीही सुविधा नाही, त्यांनी गावातील कोविड सेंटर येथे दाखल व्हावे. लक्ष्मी बँकेचे संचालक एन. डी. पाटील, व्यवस्थापक गजानन शेडबळे, शंकरराव शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष एस. बी. पाटील, सचिव रविकांत संगलगे, म्हैसाळ दूध पुरवठाचे संचालक रमेश आवटी, ग्रामपंचायत सदस्य शेखर मराठे उपस्थित होते.