लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळासह उत्तर विभागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केली.
शिरशी, घागरेवाडी, प.त.शिराळा, भटवाडी या गावांतील नुकसान झालेल्या भागाची पाहणी सत्यजित देशमुख यांनी केली. यावेळी देशमुख म्हणाले, तालुक्यातील उत्तर भागातील गावांमध्ये ढगफुटी झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेती, पेरणी केलेले भात, सोयाबीन, भुईमूगसह अन्य पिकांचे बियाणे वाहून गेले आहे. बांध व ताली फुटल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या विहिरीत माती गेल्यामुळे विहिरीचे नुकसान झाले आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. संसारोपयोगी साहित्य भिजून खराब झाले आहे. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी यावेळी केली.
यावेळी शिरशी सरपंच एम. बी. भोसले, उपसरपंच सर्जेराव महिंद, माजी सरपंच तानाजी कुंभार, सेवा सोसायटी अध्यक्ष संजय महिंद, घागरेवाडी सरपंच उषा घागरे, प.त. शिराळा सरपंच संगीता झेंडे, दत्ताजी महिंद, अशोक घागरे, तानाजी खोचरे, बापूसो जाधव, दत्तात्रय खोचरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, विलास एडम, उत्तम दंडवते, संभाजी ढवळे, कृष्णा शिंदे, सुरेश महिंद, सचिन भोसले, नथुराम दंडवते, संभाजी ढवळे, शिवाजी चोगुले, तुकाराम पाटील, ग्रामसेवक तलाठी, कृषी सहायक, आदींसह शेतकरी उपस्थित होते.