सांगली : विद्यार्थी आणि पालक यांची दिशाभूल करणाऱ्या ‘स्मरणशक्ती वाढवा’ या प्रकारच्या कार्यक्रमांची संख्या वाढत आहे. वेळोवेळी यामध्ये सहभागी असणाऱ्या तज्ज्ञांचा भांडाफोड अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केला आहे. भविष्यात या प्रकारांना शासकीय स्तरावरून आळा घालणे गरजेचे आहे. अशी मागणी सांगली ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रदीप पाटील यांनी आज, बुधवारी पत्रकार बैठकीत केली. डॉ. पाटील म्हणाले की, स्वत:ला ‘स्मरणशक्ती गुरू’ म्हणवून घेणाऱ्या काहींनी राज्यभर दौरा सुरु केला होता. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी पाच हजार रुपये शुल्क आकारले जात होते. ग्राहकांची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन शहरातील हे कार्यक्रम बंद पाडले होते. त्यावेळी संबंधित ‘स्मरणशक्ती गुरू’ हे मानसविज्ञान शाखेचे पदवीधरही नसल्याचे आढळून आले आहे. स्मरणशक्ती कोणत्याही तंत्राने वाढविता येत नाही. ती जनुके, मेंदूची रचना आणि मेंदूतील रसायने यावर अवलंबून असते. संपूर्ण पुस्तक किंवा सर्व विषयांचा अभ्यास लक्षात ठेवता येत नाही, असे मनोविज्ञान सांगते. परंतु याची माहिती सामान्यांना नसल्यामुळेच ‘स्मरणशक्ती गुरू’च्या माध्यमातून त्यांची फसवणूक होते. सांगलीत स्मरणशक्ती गुरूंनी अंनिसच्या पवित्र्यापुढे माघार घेऊन, ग्राहकांकडून घेतलेले सर्व शुल्क परत केले आहे. यापुढे असे कोणतेच अवाजवी दावे करणार नसल्याचेही लेखी कळविले आहे. असे असले तरीही राज्यातील काही ठिकाणी ‘स्मरणशक्ती गुरू’ हात-पाय पसरू लागले आहेत. यावर नियंत्रण ठेवून ग्राहकांची फसवणूक थांबविणे आवश्यक आहे. याकरिता शासनाने पुढाकार घ्यावा व आधुनिक बुवाबाजीची तातडीने दखल घ्यावी, यासाठी अंनिसशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
बुवाबाजीवर शासकीय नियंत्रण हव
By admin | Updated: February 26, 2015 00:06 IST