सिंदूर (ता. जत) येथे आमदार अरुण लाड यांच्या हस्ते सिंदूर लक्ष्मण यांचे नातू राम नाईक व लक्ष्मण नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : शंभर वर्षांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यासह कर्नाटकातील चार जिल्ह्यांत इंग्रजांविरोधात उठाव करून हौतात्म्य पत्करलेले क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कुटुंबास स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा द्यायला हवा, अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी केली.
सिंदूर (ता. जत) येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळीमार्फत क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतिशताब्दी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲड. सुभाष पाटील, प्रा. दादासाहेब ढेरे, स्मृतिशताब्दी समितीचे सचिव मारुती शिरतोडे, सरपंच गंगाप्पा हारुगेरी, सुरेश मुडशी प्रमुख उपस्थित होते.
आमदार अरुण लाड म्हणाले की, क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या वारसदारांना स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी शासनदरबारी विशेष प्रयत्न करणार असून, या क्रांतिवीरांच्या जन्मभूमीत भव्य स्मारक व्हायला हवे. सध्या चालू असलेल्या पुतळा उभारणीसाठी स्वातंत्र्यसेनानी क्रांतिअग्रणी डॉ. जी डी. बापू लाड कुटुंबीयांकडून एक लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा त्यांनी केली.
क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या इतिहासाची माहिती घेणारे इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांचा आमदार अरुण लाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन बी. आर. पाटील व प्रा. हणमंत मगदूम यांनी केले. यावेळी बी. आर. पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुडशी, शिवानंद हारुगिरी, अप्पासाहेब मुल्ला, वीर सिंदूर लक्ष्मणचे कुटुंबातील पणतू राम नाईक, लक्ष्मण नाईक, सदाशिव मगदूम, बाबूराव जाधव, ॲड. सतीश लोखंडे, आदी उपस्थित होते.
160721\img_20210716_152246.jpg
क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कुटुंबास महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा द्यावा : आमदार अरुण (आण्णा) लाड