लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्याला रेमडेसिविर व लसींचा जादा प्रमाणात पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, सांगली, मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रासह तसेच जिल्ह्यामध्ये दहा तालुक्यांत दररोज सरासरी १५०० ते १९०० कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्याही खूपच वाढली आहे. हे प्रमाण राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. सध्या जिल्ह्याला
दररोज सरासरी २२ ते २५ हजार लसींचा पुरवठा होत आहे. तो जेमतेम चार दिवसच पुरतो. जर लसींची संख्या प्रतिदिन ५० हजार ते १ लाख एवढी उपलब्ध झाल्यास संपूर्ण आठवडाभर लसीकरण राबविता येईल.
रेमडेसिविर इंजेक्शनचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. दररोज १२०० इंजेक्शनची आवश्यकता असताना ६०० ते ७०० एवढाच पुरवठा होत आहे. यामध्ये वाढ करून १२०० इंजेक्शनचा पुरवठा व्हावा. लसीचा पुरवठा गावाच्या व वाॅर्डच्या लोकसंख्येनुसार झाल्यास वेगाने होईल आणि जिल्ह्याचा मृत्युदर कमी होईल. त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त लसींचा व रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.