इस्लामपूर : इस्लामपूरच्या तहसील कार्यालय इमारतीस मोठा ऐतिहासिक वारसा आहे. ही इमारत कमकुवत झाल्याने या ठिकाणी प्रशस्त,सुंदर इमारत बांधली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या इमारतीमधून वाळवा तालुक्यातील जनतेला तितकीच तत्पर व विनम्र सेवा द्यावी,अशी भावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
इस्लामपूर येथे नव्याने बांधलेल्या तहसील कार्यालय इमारतीची वर्षपूर्ती तसेच धरणग्रस्तांसाठी जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, पुनर्वसनचे जिल्हाधिकारी नाटकर, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस यांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, आपण सर्वांनी इमारतीची स्वच्छता चांगली ठेवली आहे. तहसील कार्यालयाने पूर परिस्थिती तसेच कोरोनाच्या संकटकाळात चांगले काम केले आहे. पूरपरिस्थितीतील तसेच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान निधीचे वाटप केले आहे. अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. प्रत्येक वसाहतीमध्ये जावून त्यांचे प्रश्न समजावून घेवून सोडविले आहेत.
यावेळी पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कोरोना कार्यकाळात निधन पावलेले खरातवाडीचे ग्रामसेवक रघुनाथ वाटेगावकर यांच्या कुटुंबीयांना पाटील यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
प्रारंभी तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी स्वागत व प्रास्ताविकात आढावा मांडला. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती नेताजी पाटील, जि. प. सदस्य संभाजी कचरे,संजय गांधी निराधर योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे,तसेच विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नायब तहसीलदार दीक्षात देशपांडे यांनी आभार मानले.
फोटो ओळी- १८०१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर तहसील न्यूज
इस्लामपूर तहसील कार्यालयातील कार्यक्रमात जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गोपीचंद कदम,नागेश पाटील,रवींद्र सबनीस, शुभांगी पाटील उपस्थित होते.