सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सुमारे ५० ते ६० पोलिसांच्या पथकाने बुधवारी पडक्या विहिरीत ठेवण्यात आलेल्या जिलेटीनच्या सहा जिवंत कांड्यांसह दोन चॉपर, दोन तलवारी व छऱ्याचे रिव्हॉल्व्हर असा शस्त्रसाठा व स्फोटके जप्त केली. अज्ञाताने दूरध्वनीवरून दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. एका सॅकमध्ये हा साठा ठेवून ती विहिरीत टाकण्यात आली होती.या शस्त्रसाठ्याबाबत रात्री उशिरापर्यंत जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी संशयितांकडे चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी झाली होती. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास एका अज्ञाताने येथील शासकीय रुग्णालयासमोरील कॉईन बॉक्सवरून जिल्हा पोलीसप्रमुख सावंत यांना शस्त्रसाठ्याबाबत माहिती दिली. कवलापूर येथील गीतानगरमधील विमानतळाजवळील पडक्या विहिरीत सॅकमध्ये जिलेटीन कांड्या, तलवार, चॉपर ठेवून ही बॅग वाहनधारकाने विहिरीत टाकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सावंत यांनी तत्काळ मोठा फौजफाटा घेऊन ही विहीर शोधून काढली.घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक राजू मोरे, पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, बाँब शोधपथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, आदी सुमारे ५० ते ६० पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. बाँब शोधपथकाने काठ्यांच्या साहाय्याने ही बॅग वर काढली. त्यानंतर निर्जनस्थळी जाऊन इलेक्ट्रॉनिक्स यंत्राच्या साहाय्याने बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये स्फोटके असल्याचे दिसून आले. बॅग उघडली असता त्यामध्ये सहा जिवंत जिलेटीनच्या कांड्या, दोन चॉपर, दोन तलवारी व एक छऱ्याचे रिव्हॉल्व्हर आढळून आले. नंतर या जिलेटीनच्या कांड्या निष्क्रिय करण्यात आल्या.सायंकाळी सर्व स्फोटके जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. याबाबत अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव अधिक तपास करीत आहेत. शोधमोहिमेचा परिणामया स्फोटकाबाबत जिल्हा पोलीसप्रमुख सावंत यांनी स्वत: संशयितांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून हत्यारांची जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. त्यामुळे ही हत्यारे विहिरीत टाकण्यात आली असावीत. त्याचबरोबर कवलापूर, बुधगावमध्ये झालेल्या मारामारीशीही याचा संबंध असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली. चौकशीला बोलावले --ज्याने ही सॅक विहिरीत टाकली, त्याच्या वाहनाचा क्रमांक अज्ञाताने सांगितला आहे. या क्रमांकाच्या सर्व वाहनधारकांना पोलिसांनी चौकशीसाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती. ज्या पान दुकानातून अज्ञाताने फोन लावला होता, त्याच्या मालकांकडेही रात्री चौकशी सुरू होती.
कवलापुरात जिलेटीन कांड्या जप्त
By admin | Updated: March 5, 2015 00:15 IST