सांगली : भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रावर येण्याचे टाळत आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, काही नागरिकांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत बाळगलेला फाजील आत्मविश्वास, कोरोनाप्रती हलगर्जी, मास्क न
लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे यामुळे कोरोनांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या सर्वत्र कोरोना लसीकरण सुरू असले तरी कोरोनाचा प्रसार रोखण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे अधिकाधिक सार्वत्रिक लसीकरण होणे हा आहे. यामध्ये 'घरोघरी जाऊन कोरोना लसीकरण मोहीम' राबवणे हा एक अत्यंत परिणामकारक उपाय ठरू शकतो.
भीतीमुळे नागरिक लसीकरण केंद्रावर येणे टाळत आहेत. सार्वजनिक वाहतुकीतील आणि लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळत लस टोचून घेणे अनेकांना इच्छा असूनही शक्य नाही. अनेकांच्या घरी सोबतीला कोणी नाही, अशी परिस्थिती असते. त्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपाय ठरू शकतो. मुंबई व अन्य महानगरात, छोट्या शहरात, गावांमध्ये त्याचे अनुकरण होऊ शकते. लसीकरणानंतर काही प्रसंगी काही जणांना होणाऱ्या साइड इफेक्टसाठी वॉर्ड, गल्ली, विभागनिहाय, रुग्णवाहिकेची व्यवस्था करता येऊ शकते. सध्या अधिकाधिक लसीकरण होणे गरजेचे आहे. घरोघरी लसीकरणाच्या मोहिमेत समाजातील विविध संस्थांचाही सहभाग घ्यावा. शंभर टक्के लसीकरण झालेले प्रभाग, गावे यातून समोर येतील आणि कोरोनाचा आलेख खाली जाण्यास सुरुवात होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत शासन निर्णय घेऊन तसे आदेश द्यावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
चौकट
घरपोहोच भाजीपाला सुरू करावा
कोरोना काळात ज्या पद्धतीने घरपोहोच भाजीपाला उपक्रम सुरू केला, त्या पद्धतीने आता आठवडी बाजार बंद करून घरपोहोच व्यवस्था करावी. त्याचबरोबर व्यापारी पेठा पूर्ण बंद न करता व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवावीत, असेही पाटील यांनी सुचविले आहे.