इस्लामपूर येथे प्रांताधिकारी विजय देशमुख यांना शाकीर तांबोळी यांनी निवेदन दिले. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, नौशाद तांबोळी, एजाज मुजावर, रफिक मणेर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पालकमंत्र्यानी जिल्ह्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदचा सण साजरा करण्यावर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने १२ मे रोजी जिल्ह्यातील सर्व जीवनावश्यक दुकाने आणि ईदशी संबंधित सर्व व्यवहार खुले ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी विजय देशमुख यांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात १३ मेच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र त्याच दिवशी मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण आहे. पालकमंत्र्यांना याचा सोयीस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. या निर्बंधांमुळे मुस्लिम समाजावर अन्याय होणार आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्यासारखे सण साजरे केले, त्याप्रमाणे मुस्लिम समाजालाही त्यांचा सण साजरा करण्याची संधी मिळायला हवी. यानंतर हवे तर प्रशासनाने आणखी लॉकडाऊन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, नौशाद तांबोळी, दिलावर शेख, एजाज मुजावर, रफिक मणेर आणि मकसूद मोमीन उपस्थित होते.