सांगली : जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी जिल्हा परिषदेशी संबंधित कामांना जिल्हा परिषदेकडून नाहरकत घ्यावी, असा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. तसा ठरावही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेशी संबंधित अनेक विकास कामे करण्यात येतात. यामुळे जिल्हा परिषदेशी समन्वय न राहिल्यामुळे कामाचा दर्जा बिघडतो. यासाठी नियोजन समितीमध्ये कामांना मंजुरी देताना त्याची पूर्वसूचना जिल्हा परिषदेला देण्यात यावी, त्यासाठी जिल्हा परिषदेची नाहरकत घेऊनच आराखड्यात कामाला स्थान घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत ठराव करुन तो ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. विशेषत: शाळाखोल्या बांधणे, अंगणवाड्या बांधणे, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे आदीसाठी दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्यांनी त्यांना लागणारी स्टेशनरी जिल्हा परिषदेच्या छापखान्यातून घेण्याची सक्ती करण्याचाहीनिर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी विद्यार्थी गुणवत्ता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, मनीषा पाटील व इतर सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नियोजन समिती कामांंना मान्यता घ्यावी
By admin | Updated: February 6, 2015 00:44 IST