कोकरुड : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील डोंगरात पडलेल्या चरीची पाहणी भूवैज्ञानिक विभागाच्या पथकाकडून करण्यात आली. येथील अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती सांगली येथील सहायक भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी दिली.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या अतिवृष्टीने शिराळा पश्चिम भागात २३ ठिकाणी भूस्खलन, दरड कोसळणे, डोंगराला भेगा पडणे अशा घटना घडल्या होत्या. चव्हाणवाडीच्या पश्चिमेस असणाऱ्या डोंगरात दोनशे मीटर लांबीची आणि एक फूट खोलीची आडवी भेग पडली होती. याच डोंगराच्या पायथ्याशी गेल्या पंधरा वर्षांपासून उत्खनन सुरू असून, बाजूस खडी-क्रेशर सुरू आहे. खडी क्रेशर मालकाने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले असल्याने अगोदरच धोका निर्माण झाला आहे. डोंगर पोखरलेल्या वरच्या बाजूस अंदाजे पन्नास फुटांवर दोनशे मीटर लांबीची व एक फूट खोलीची आडवी भेग पडल्याने या डोंगराला धोका निर्माण झाला आहे. या चरीमुळे चव्हाणवाडी येथे माळीणसारखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त हाेत आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी सांगली येथील सहायक भूवैज्ञानिक जयंत मिसाळ व पथकाने चव्हाणवाडी येथे भेट देऊन पाहणी केली. याचा अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी तलाठी अमित जंगम, माजी उपसरपंच ज्ञानदेव पाटील, माजी सोसायटी अध्यक्ष बाबूराव वडकर, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ लोहार, पोपट पाटील आदी उपस्थित होते.
काेट
चव्हाणवाडी येथील डोंगरात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. उत्खनन केलेल्या वरच्या बाजूस आडवी भेग पडली आहे. येथे भूस्खलन होऊन डोंगर खाली आला, तरी चव्हाणवाडी गावास कसलाही धोका नाही. याबाबतचा अहवाल शासनास पाठवण्यात येणार आहे.
- जयंत मिसाळ, भूवैज्ञानिक सांगली.