सांगली : जिल्हा नियोजन समितीचा निधी परस्पर पदाधिकाऱ्यांनी पळविला आहे. त्याचे पडसाद बुधवारी होणाऱ्या महासभेत उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, माळबंगला जागेचा विषय पुन्हा महासभेसमोर आला आहे. त्यावरही वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. काळीखण व परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी २८ लाखांच्या निधीला मंजुरी देण्याचा विषयही चर्चेला येणार आहे.
महापौर गीता सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन महासभा होणार आहे. जिल्हा नियोजन समितीतील निधीचे समान वाटप व्हावे, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली आहे. महापौरांसह पदाधिकारी, स्थायी समिती सदस्यांनी जिल्हा नियोजनचा निधी पळविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी केला आहे. नगरसेवकांमध्येही याबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याचे पडसाद महासभेत उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माळबंगल्याजवळील जागेचा विषय पुन्हा महासभेसमोर आला आहे. महापालिकेचीच जागा महापालिकेला विकणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी केली आहे. या विषयावरूनही सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काळीखण विकासासाठी १ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. तसा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक निधी मंजुरीचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे.
महापौर गीता सुतार यांनी मंगळवारी काळीखण व परिसराची पाहणी केली. यावेळी उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, सभागृह नेते युवराज बावडेकर, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुरणे आदी उपस्थित होते.